Thursday, 19 April 2018

डायरीचे पान आठवे.....योगायोगाने अब्दुल आजच कां आठवे?

सौजन्य : श्री संजय परांजपे

डायरीचे पान आठवे.....योगायोगाने  अब्दुल आजच कां आठवे?

ट्रेनच्या प्रवासात साईडचा अप्पर बर्थ फार सोईचा असतो. छान आराम तर करता येतोच पण टेकुन, तंगड्या पसरुन मस्त वाचनही करता येते.
असाच एकदा प्रवास करत होतो, सकाळी साडेसातच्या सुमारास उठुन फ्रेश झालो, स्टेशनवर चहा घेतला, महाराष्ट्र टाईम्स घेवून वाचत पडलो. ही सकाळची वेळ अप —डाउन करणार्‍यांची गर्दीची असते. ही मंडळी मिळेल त्या सिटवर आपला हक्क असल्या सारखा डेरा जमवतात. ही चेहरे नसलेली रोजची गर्दी न्याहाळण्याचा मला छंदच जडला होता.
गाडी सुरु झाली,मी एकटाच बर्थवर बसलेला पाहुन, गर्दीतल्या एका ईसमाचे डोळे माझ्याकडे लागले होते, हे मी अनुभवाने ताडले. साधारण चाळीशीच्या पुढचाच होता. अंगात स्वच्छ पांढरा लखनवी झब्बा, अखुड पायजमा, केस व दाढी मेंदीनी रंगवलेली, डोक्यावर विणकाम केलेली टोपी, खांद्यावर चौकटीचा मोठा अरबी रुमाल, नमाजी मुसलमाना सारखा कपाळावर काळा डाग, पाणीदार काळे डोळे, दाट भूवया, व लांबसर पापण्या, उंच पण पुढे वाकलेली किडकिडीत देहयष्टी. समक्ष नजरा नजर होताच, त्याने हातानी खुण करत, मी वर येवू का"? असं विचारले. मी सुध्दा खुणेनेच होकार दिला. चप्पल खालच्या सीटमागे सरकली, व भली मोठी जड थैली वर ठेवून हा ईसम माझ्या समोर ऐसपैस बसला. माझ्या हातातला पेपर समोर ठेवत मी माझे पाय अखडते घेतले. कांही म्हणा या रोजच्या प्रवासामुळे या अप—डाउन करणार्‍या प्रवाश्यांबद्दल मला थोडे ममत्व आहे, कारण आमची जातकुळी एकच आहे ना!

वर बसल्यावर त्याने माझ्या पेपरचा ताबा घेतला,(सह प्रवासी सहसा असेच फुकटे वाचक असतात). त्याची नजर R.K.Laxman च्या कार्टुनवर खिळलेली होती, बराच वेळ निरिक्षण करुन, त्याने थैलीतुन पेन्सिल कटर सारखा तीक्ष्ण चाकू, कान व दात कोरणी बाहेर काढली, तसाच एक पूर्ण उंचीचा खडू काढुन वरचा निमुळता भाग कापला, व तो खडू तासायला सुरुवात केली. केवळ पंधरा मिनिटांत त्याने आर.के.लक्ष्मण जसे इंदिरा गांधींचे कार्टुन काढतात, अगदी तसेच शिल्प त्या खडुवर साकारले. मी आवाक होवून पहात होतो. आता त्याने कान कोरणी घेवून इंदिराजींच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळेचे गोलाकार मणी कोरले, दात कोरणीने केस, भुवया, डोळे व पापण्या कोरल्या. (च्यायला या हलणार्‍या गाडीत आपल्याला धड वाचन करता येत नाही). इतके हुबेहुब शिल्प होते की बस्स!
मी त्याची तारीफ करावी म्हणून "बढिया" म्हटले, पण त्या कलाकाराचे लक्ष फक्त त्या पेपर मधल्या कार्टुनवर होते. ते शिल्प माझ्या हातात देत, त्याने पुन्हा थैलीत हात घालुन बारीक लोखंडी तारेचे "रीळ" बाहेर काढले, चांगली हातभर लांब तार तोडली, व अजुन थोड्या लहान आकाराचे दोन तारांचे तुकडे करुन. ते पेपर मधले कार्टुन पुनःश्च न्याहाळले. बघता बघता त्याने अशी मस्त तार वळवत, आर.के. लक्ष्मणचा "काॅमन मॅन"ची बाह्य बाजू तयार केली. काना पासुन ते गळ्यापर्यंत व या बाजुचे मिश्यांपासुन ते गळ्यापर्यंतची दोन टोके जुळवली. दुसर्‍या दोन तारांचा चष्मा, काड्या व कान, नीट जुळवून हा हाताच्या पंजा इतका काॅमन मॅन तयार झाला. लक्ष्मण ज्या ताकदीने टक्कल केस, आश्चर्य वाटेल, असे दाखवण्या साठी उंचावलेल्या भुवया चितारतात ना! अगदी हुबेहुब हा काॅमन मॅन व मिश्किल चेहर्‍याच्या इंदिरा गांधींची निमुळती हनुवटी! इतके छान बारकावे या कलाकाराने साकारले होते की अक्षरशः अवाक झालो होतो.
काय विलक्षण प्रतिभेचा कलाकार होता तो! आर.के. लक्ष्मण व या कलाकाराचे अद्वैत दर्शन होते ते, या दोन महान कलाकारांचे तादात्म्य स्वरुप किती साठवावे या डोळ्यांत? व्वा!
या आवलीयाशी परिचय व बोलते करणे गरजेचे होते.
मी विचारले ' भाईसाब क्या नाम है आपका?
तो 'अब्दुल' म्हणत...... माझ्या अंगावर खेकसला! " क्या रे.... मुसलमान आदमी देखां तो हिंदीमे बाता कायकु करता.. रे? मराठी दिसतोस मग मराठीत कां नाही बोलत? त्याचे शुध्द मराठी उच्चार ऐकुन मी चक्रावलो, पण त्याच्या हिंदी टोन वरुन तो आंध्र सीमेलगतचा मराठी भासला.
त्याचे एकेरीवर येणे थोडे खटकले, पण एक तर वयानी तो मोठा होता व कलाकार मंडळी तशी चक्रमच.
मी उत्सुकतेने विचारले " अब्दुल भाई, कोठे शिकलात हो ही कला?
तो म्हणाला, "माझ्या आब्बांकडून", ते फार मोठे कलाकार... अप्रतिम चित्रकार! विशेष म्हणजे अॅल्युमिनीयमच्या पत्र्यावर एनग्रेव्हींग करण्यात त्यांचा हातखंडा.
"आब्बांनी ३'x२' फुटाच्या पत्र्यावर संपूर्ण हज यात्रेचे चित्र कोरले आहे, अगदी छोटेछोटे बारकावे टीपून त्यांनी "खाने काबा व मस्जिदे हरम" इतके मस्त तयार केले व रंगवले.सहा महिने लागले तयार करायला, लाकुड तासुन पेन्सिली सारखी धार करायची व मुठीत धरुन दाब देवून चित्र काढायचे. इतके बारकावे कोरणे, सोपे नसते, एक चूक झाली की संपूर्ण पत्रा वाया जातो. आजही ते आमच्या घरी आहे. पण मला नाही जमले कधी ते, कारण पत्र्यावर दाब देतो ती उलटी बाजू असते, प्रत्यक्षात चित्र मागे उमटत असते. हे लक्षातच येत नसे. पण एके दिवशी आब्बांनी त्यातले खरे तंत्र समजावून सांगितले. चित्र काढणे नाही जमले पण "तो मंत्र" पुढे आयुष्यात फार उपयोगी पडला. डाय बनवतांना मेल फिमेल ची संकल्पना डोक्यात फिट्ट बसली.

मी वाचारले " तुमचे आब्बा कला शिक्षक आहेत का?
तो... आहेत नाही होते! एक उत्तम मेकॅनिक होते, ट्रकच्या गॅरेज मधे काम करायचे, मी नववित असतांना एका आपघातात ते वारले.
घरची परिस्थिती जेमतेम होती, शिक्षण सोडले व एका लोखंडी पत्र्याच्या प्रेस वर्कशाॅपमधे हेल्पर म्हणून कामाला लागलो. तेथले एकुणएक काम आत्मसात केले. मालक माझ्या कामावर खुष असे. त्याचे वय झाले होते. दोन वर्षांत आब्बांच्या एल.आय.सी.चे बरेच पैसे मिळाले. " भाऊ उपरवाले की मेहरबानी पहा!  मी जेथे हेल्पर म्हणून काम केले, आज त्याच वर्कशाॅपचा मालक बनलो आहे.

मी विचारले,काय प्राॅडक्टस् आहेत तुमची?
त्याने थैलीतुन एक रिंग बाहेर काढली, गोल, षटकोनी, चौकोनी अशी विविध आकाराची लाॅकेटस् आडकवलेली होती. तांबे पितळे, अॅल्युमिनीयमवरची, निरनिराळ्या देवदेवता, बाबाबुआंची लाॅकेटस् पाहुन चक्रावलो.
अब्दुल म्हणाला " लहान भाऊ सुध्दा कलाकार आहे, तो पहातो वर्कशाॅप आणी मी सगळी देवस्थाने हिंडुन आॅर्डर्स आणतो. "हे बघ साईबाबांचे लाॅकेट! मी स्वतः बनवले आहे, बाबांच्या चेहर्‍यावरचे भाव बघ! त्यांची कफनी हातातले भीक्षापात्र. छोटेछोटे बारकावे पाहुन मी थक्क झालो. अब्दुल एकदम संतापुन म्हणाला, अरे....... अनेक जणं लाॅकेट बनवतात, पण साले....... मारुती आहे का माकड हे कळत नाही........ हरामखोर xxवे. देवांना सुध्दा फसवती हे xxxxx, भावीकांना फसवतात ही लोकं. पण आपल्या तत्त्वात नाही बसत असली भामटेगिरी, आपल्या मालाचा भाव दुप्पट असतो, पण जाणकार व्यापारी बोलावून आॅर्डर देतात.
मी विचारले " आता कोठे निघालात? तर तो निर्विकारपणे म्हणाला " माहुरच्या देवीच्या दर्शनाला! " तू गेला आहेस का कधी?
मी नाही म्हणताच " येडा आहेस का रे तू? इतके जागृत देवस्थान आहे ते, "जा.... एकदा आणी घे दर्शन! साला येडा बम्मन दिसतोय! मी ओशाळुन हो म्हणालो.
मगत्याने संपूर्ण माहुरचा इतिहास सांगितला, रेणूका माता, परशुराम, अनसुया माता, जमदग्नी....... दत्तजन्म...... अबब.... चक्रावलो, प्रश्न पडला की मी हिंदू ब्राह्मण का हा अब्दुल?

या अब्दुलने भारत भ्रमण केले होते, महाराष्ट्रातली सर्व देवस्थाने, अष्टविनायक, साडेतीन शक्तीपीठे, बाबा......महाराजांचे मठमंदिरे....
त्या बरोबर स्थान महात्म्यांच्या सर्व पुस्तकांचा सखोल अभ्यास त्याने केलेला त्याच्या बोलण्यातुन जाणवत होता. महाभारता उल्लेख असलेल्या सर्व शंखांची नावे त्याला पाठ होती, रुद्राक्षाची पारख होती.
बारा वर्षातुन एकदा येणारे कुंभमेळे हे त्याच्या दृष्टीने कमाईचे पर्व असते.
असा कधी विचार केला नव्हता की, गंडेदोरे, आंगठ्या, लाॅकेटस् , स्थानमहात्म्याची पुस्तके, आरत्यांच्या कॅसेटस् यांची आपल्या देशात कीती मोठी बाजारपेठ असेल ना?
हा नुसता कलाकारच नव्हे तर पंडीत होता. यावर तो सहज म्हणतो " हा आपला व्यवसायाचा भाग आहे", आपला गृहपाठ नकोका चांगला असायला?
खरं आहे त्याचे, बिझिनेस मॅनेजमेंट मधे अजुन काय वेगळे धडे गिरवतो आपण?

अचानक गंभीर होत अब्दुल म्हणाला, " कधी कधी आपलीच कला आपल्यावर रुसते! अश्या एका चक्रव्युहात आपण आडकतो की मार्गच सापडत नाही.
अब्दुल:—"मी अनेकवेळा अक्कलकोटला जावून स्वामींची प्रतिमा टिपण्याचा प्रयत्न केला, चार पांच वेळा बनवलेली डाय फेकुन दिली असेल.... पण मनासारखे स्वामींच्या चेहर्‍यावरचे धीरगंभीर भाव कांही केल्या कृतीत उतरत नव्हते. बेचैन आवस्थेत कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हते.
एक दिवस लवकर घरी आलो.... आराम केला पण दुपारची झोप लागली नाही........ तळमळत होतो........ आपली कला आपल्याला सोडून गेली? आॅर्डर सोडून द्यायची की इतरजण जसा माल देतात तसा देवून मोकळे व्हायचे? प्रश्न...... प्रश्न आणी प्रश्न! धंदा झाला म्हणून काय? ..... बेईमानी करायची? नाही..... सोडून देवू ही आॅर्डर......

संध्याकाळच्या नमाजाची वेळ झाली "मगरीब" नमाज आदा केली....... शांतपणे डोळे मिटले किती वेळ बसलो असेन माहित नाही.पण अचानक मनःपटलावर तो स्वामींचा करुणामय चेहरा दिसु लागला..... याच प्रतिमेचा ध्यास लागला होता. तडक उठलो... स्केचबुक काढले....... पण पेन्सिल मात्र कोणतीतरी अज्ञात शक्ती चालवित होती..... चित्र पूर्ण झाले. ...... डोळ्यातुन अश्रुधारा वहात होत्या.... !

का....रे भाऊ..... यालाच तुम्ही
साक्षात्कार म्हणतात का?
मी काय उत्तर देणार? मला काय कळत होतं, या अध्यात्मातले?
पण अश्या साक्षात्कारांची वर्णने वाचली होती. शहेनाई नवाज उस्ताद बिस्मिल्ला खाँ, यांना कृष्णमंदिरात बासरीचे मधुर स्वर ऐकु आल्याची त्यांची स्वतःची आठवण. तसेच तबला नवाज उस्ताद थिरखवाॅ साहेबांना शिवमंदीरात डमरुचा नाद ऐकु आलेला. पंडीत मल्लीकार्जुन मन्सुर यांना अल्लादियाॅ खाँ साहेबांच्या आवाजाची आलेली प्रचिती. गुरुवरचे प्रेम, श्रध्दा बघा मल्लीकार्जुन हे कर्मठ शैव पण देवघरात शिवा बरोबर अल्लादियाॅ खाँ साहेबांची प्रतिमा ते पूजत असत.

अध्यात्म, साक्षात्कार, कुंडलिनी जागृती, सिध्दी....... कठोर साधनेतुन प्राप्त होत असते.
तशीच कठोर कलासाधना अब्दुलचीही होती. अब्दुलला आलेली प्रचिती वा झालेला साक्षात्कार हा चमत्कार खचितच नव्हता!........ होती, ती त्याच्या कठोर कला साधनेची फलश्रुती.

प्रश्न असा पडतो, की! सर्व धर्मांमधे अध्यात्म असतं
पण शुध्द आध्यात्माला कोणता एक धर्म असतो?............
सलाम........,,, अब्दुल!!!!!! 🙏🏻🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment

Thank You

मोदींनी दुखवलेली माणसे जास्त आहेत का सुखावलेली ????

मोदींनी दुखवलेली माणसे जास्त आहेत का सुखावलेली ???? हेच गणित 2019 मध्ये महत्वाचे ठरेल मोदी हे एक सर्वसामान्य राजकारण्याहून वेगळेच व्यक्...